कोणतीही
घटना सहजा - सहजी घडत नाही, प्रत्येक घटनेला एक विशिष्ठ
कार्यकारणभाव असतो. असा कार्यकारणभाव तपासण्याच्या प्रक्रियेतूनच वैज्ञानिक
दृष्टीकोन निर्माण होतो. विशेषतः जगात औदयोगिक क्रांतीनंतरच्या कालखंडात ही प्रक्रिया
प्रभावीपणे सुरु झाली असे म्हणता येईल.१६ व्या व १७ व्या शतकात शास्त्रीय संशोधन
कसे करावे तसेच शास्त्रीय संशोधन कसे असावे याबाबत चिन्तन झाल्याचे लक्षात येते.
औदयोगिक क्रांती व तांत्रिक क्रांती नंतरच्या काळात मानवी जीवनात व आधुनिक समाजात
दिवसेंदिवस सतत गुंतागुंत वाढत आली असल्याचे लक्षात येते. यामध्ये भर म्हनुन कि
काय जगामध्ये सातत्याने बदलांची मालिकाच सुरु झाल्याची पाहावयास मिळते. या
बदलांमधूनच आज समाजात अनेक प्रकारच्या समस्या निर्माण झाल्याच्या आढळतात.संशोधन
नसेल तर अश्या प्रकारच्या समस्या सोडवणे खूप गुंतागुंतीचे ठरले असते. परंतु
संशोधनाच्या माध्यमातून मानव समस्या सोडवण्याचा प्रयत्न अनेक वर्षांपासून करत आला
असल्याचे इतिहासावरून लक्षात येते. संशोधन म्हणजे एक असा प्रयत्न कि ज्या
माध्यमातून सत्याचा शोध घेणे होय किंवा
एखाद्या विशिष्ट समस्येचे उत्तर शोधण्यासाठी
शास्त्रीय पद्धतीचा उपयोग होय. विकसित
तंत्रज्ञानाच्या सोबतीने शास्त्रीय पद्धतीच्या मदतीने संशोधनाच्या माध्यमातून आज
मानवाच्या वेगवेगळया समस्या सोडवणे शक्य होऊ लागले आहे.