अर्थशास्त्र, इंग्रजी, व राज्यशास्त्र संशोधन केंद्राच्या वतीने एक दिवसीय कार्यशाळा संपन्न:
अंबाजोगाई : दिनांक १३.0१.२०२४ रोजी म. शि. प्र. मंडळ संचलित यशवंतराव चव्हाण महाविद्यालय अंबाजोगाई येथे इंग्रजी, अर्थशास्त्र व राज्यशास्त्र विषयातील संशोधन केंद्राच्या वतीने संशोधन पेपर लिहिण्याची तंत्रे (Techniques of Research Paper Writing) या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली. कार्यशाळेसाठी साधन व्यक्ती म्हणून डॉ. सुनील राऊत ( इंग्रजी विभाग, बाबुरावजी आडसकर महाविद्यालय, केज) तसेच डॉ. देविदास नागरगोजे ( अर्थशास्त्र विभाग, स्वा. सावरकर महाविद्यालय, बीड) व डॉ. काकासाहेब पोकळे ( राज्यशास्त्र विभाग, व्ही. पी. कॉलेज, पाटोदा) हे उपस्थित होते. या तिन्ही साधन व्यक्तीनी इंग्रजी, अर्थशास्त्र व राज्यशास्त्र विषयाच्या संशोधकांनी संशोधन पेपर लिहिताना कोणती तंत्रे उपयोगात आणली पाहिजेत याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. ज्यामध्ये संशोधन पद्धतीचा योग्य उपयोग, वांगमय चौर्य विरहित लिखाण, योग्य संदर्भांचा वापर, दर्जेदार जर्नल विशेषतः UGC Care Listed, UGC Approved Journal मधून लिखाण, समाज उपयोगी संशोधन इत्यादी महत्वपूर्ण बाबींवर प्रकाश टाकला.
संशोधक विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या या कार्यशाळेत तिन्ही विषयाच्या मिळून 68 संशोधकांनी, प्राध्यापकांनी सहभाग घेतला. कार्यशाळेचा समारोप अध्यक्ष प्राचार्य डॉ. शिवदास शिरसाठ यांनी केला. या प्रसंगी बोलताना त्यांनी संशोधन पेपर हा संशोधन पद्धतीचा पुरेपूर उपयोग करून लिहावा व गुणात्मक संशोधनाला चालना द्यावी असे प्रतिपादन केले. कार्यशाळेच्या प्रारंभी अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. दीपक भारती यांनी प्रास्ताविक करून कार्यशाळा आयोजन मागची भूमिका मांडली. कार्यशाळेचे सूत्रसंचालन इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. मुकुंद राजपंखे यांनी केले तर राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. प्रकाश लोखंडे यांनी आभार मानले. या कार्यशाळेस महाविद्यालयाचे उपप्राचार्य व संशोधन मार्गदर्शक डॉ. रमेश शिंदे, संशोधन मार्गदर्शक डॉ. अहिल्या बरुरे, इतर सर्व संशोधन मार्गदर्शक, प्राध्यापक व संशोधक विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यशाळेची निवडक छायाचित्र
No comments:
Post a Comment